3:
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रविवारी झालेल्या मतदानात राज्यात एकूण 68.28 टक्के मतदान झाले. त्यामध्ये परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 74.89 टक्के मतदान नोंदवण्यात आले. त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये 74.45 टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 72.69 टक्के मतदान झाले. याउलट रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी 55.79 टक्के मतदान झाले आहे.
या निवडणुकांमध्ये 731 जिल्हा परिषद जागा आणि 1,462 पंचायत समिती जागांसाठी एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. राज्यातील मतदारसंख्या दोन कोटींपेक्षा अधिक असून, त्यामध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला आणि 468 इतर प्रवर्गातील मतदारांचा समावेश होता.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यभरात 25,471 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच, सुमारे 1.28 लाख अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी तैनात करण्यात आले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या निवडणुका मूळतः 5 फेब्रुवारी रोजी होणार होत्या, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या शोककाळामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले असून, राज्यातील सत्तासमीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
— 24x7livemarathi News