3:
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती, याची माहिती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना असावी, असा मोठा दावा विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना बनसोडे म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले असून, ते पद सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यासाठी कमालीची घाई सुरू आहे. मात्र, “मला याची माहिती नव्हती,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी, 12 फेब्रुवारीला अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे या निर्णयाची कल्पना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना नक्कीच असावी, असा दावा बनसोडेंनी केला.
आजचा शपथविधी हा वरिष्ठांच्या आग्रहामुळे होत असल्याचंही बनसोडेंनी नमूद केलं. “शरद पवार हे आमचं दैवत आहेत. त्यामुळे पवार साहेबांशी चर्चा करूनच पुढचे निर्णय घ्यायला हवेत का, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे,” असं बनसोडे म्हणाले.
दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईघाईने का झाला, याचं कारण स्पष्ट केलं. घटनेतील कायदेशीर बाबींमुळे ही प्रक्रिया चौथ्याच दिवशी पार पाडावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.
“हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांना या सर्व बाबी माहीत असतीलच असं नाही,” असं शेळके म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत ठामपणे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं म्हणून आज शपथविधी घेतला, असं म्हणणं चुकीचं ठरेल, मात्र पुढील पंधरा दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल, असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “मला याबाबत माहिती नाही. सकाळी वाचलं. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. आता कुणीतरी पुढे यायला हवं, म्हणून त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला आहे. आमचा मार्ग वेगळा आहे.”
ते पुढे म्हणाले, “परिवार वेगळा आणि राजकारण वेगळं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.”
शरद पवारांनी हेही स्पष्ट केलं की, गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होत्या. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. 12 फेब्रुवारी ही तारीख अजित पवारांनी दिली होती. मात्र, अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्व चित्र बदललं.