3:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलीकडे समोर आलेल्या अजित पवार आणि शरद पवार गटातील बैठकीच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित असून, कोणत्याही विलिनीकरणाच्या चर्चेसाठी नव्हता, असा दावा त्यांनी केला.
शरद पवार गटाकडून 17 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा व्हिडिओ आज जाहीर करण्यात आला. या व्हिडिओमुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकीबाबत चर्चांना उधाण आले. मात्र, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की ही बैठक केवळ निवडणूक संदर्भातील चर्चा करण्यासाठीच झाली होती.
तटकरे यांनी सांगितले की, जनतेची भावना लक्षात घेता सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी दोन वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया देणे टाळले. बारामती येथे कृषी प्रदर्शनाच्या वेळी झालेली बैठक ही केवळ चहापानासाठीची अनौपचारिक बैठक होती, असा खुलासा त्यांनी केला. यापूर्वी खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेचा खुलासा केला असल्याचेही तटकरे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. 17 जानेवारी रोजी गोविंदबाग येथे झालेल्या बैठकीचा व्हिडिओ आता समोर आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.