4:
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सासरच्या ५ जणांविरुद्ध विनयभंग, मानसिक छळ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेचे लग्न २५ मे २०२५ रोजी झाले होते. ४ जून रोजी ती पतीच्या संयुक्त कुटुंबात नांदण्यासाठी आली होती. सुरुवातीला सर्व काही चांगलं असल्यासारखं तिला वाटलं, पण काही दिवसांतच सासरच्या घरातील वातावरण बदललं आणि छळ सुरु झाला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने सुरुवातीला तिने कोणाकडेही तक्रार केली नाही, असेही तिने सांगितले.
सासरे सुभाष तायडे, दीर शुभम तायडे, सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे आणि पती ऋषभ तायडे अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, सासरे सुभाष तायडे हे घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श करत असे. पाठीवर, खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन, तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं सासर सुनेला म्हणत असे, असंही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे ती घाबरून जात असे आणि स्वतःला खोलीत बंद करून ठेवत असे, असंही पीडितेने सांगितले.
दीर शुभम तायडे विनाकारण पीडित महिलेच्या खोलीत येत असे आणि सौंदर्य, कपडे आणि लज्जास्पद नजरेने पाहत असे, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती, असा आरोप आहे.
पीडितेने आरोप केला की आरोपी वर्षा तायडे आणि शिल्पा तायडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तक्रार न करता तडजोड करण्याचा सल्ला देत आरोपींच्या वर्तनाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.
सासरांनी “बाबांच्या मनासारखे राहा, तसे केल्यास घरात सुखाने राहशील,” असे सांगून मानसिक छळ केला. पती ऋषभ तायडे कोणताही विरोध न करता “वडील सांगतील तसे वागावे लागेल,” असे पत्नीला सांगत असे.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी पतीने पत्नीला माहेरी पाठवले. मानसिक धक्का, भीती आणि समाजात बदनामी होईल या कारणांमुळे पीडित महिलेने तक्रार उशिरा दाखल केली आणि न्यायाची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.