3:
मुंबई | प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण होणार होते, असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. विशेष म्हणजे, खासदार शरद पवार यांनी स्वतः अजित पवार आणि माझ्यात या विषयावर चर्चा झाली होती, असे विधान केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या आणि लवकरच विलीनीकरणाची घोषणा होणार होती, असा खुलासा केला.
मात्र, अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कथित विलीनीकरणावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,
“राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील चर्चा ही त्यांची अंतर्गत बाब आहे. विलीनीकरणाबाबत अनेक दावे केले जात आहेत, पण प्रत्यक्ष निर्णय संबंधित पक्ष आणि नेत्यांनाच घ्यावा लागेल.”
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पुन्हा एकदा नवी राजकीय चर्चा सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या राजकारणात हे विलीनीकरण घडणार की केवळ चर्चा म्हणूनच राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.