3:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बांधकाम सभापती संग्राम सिंग कुपेकर हे मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
संग्राम सिंग कुपेकर हे लहानपणापासूनच सार्वजनिक जीवनाशी जोडले गेले असून, ते माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आहेत. राजकारणात येताना त्यांनी तळागाळातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यावर भर दिला असून प्रशासनाची कार्यपद्धती समजणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी गावोगावी प्रचार फेऱ्या काढत थेट नागरिकांशी संवाद साधला. विकास म्हणजे केवळ रस्ते, गटार किंवा पाणीपुरवठा नसून, सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात न्याय मिळवून देणेही विकासाचाच भाग असल्याचे ते सांगतात.
जिल्हा परिषदेत यापूर्वी त्यांनी बांधकाम सभापती पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, त्या अनुभवाचा उपयोग आगामी काळात अधिक प्रभावी विकासासाठी होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत संग्राम सिंग कुपेकर यांना संधी द्यावी, अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.