2:
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने तिकीट कापलेले चार टर्मचे नगरसेवक विजय इंगळे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 20 अ मधून दणदणीत विजय मिळवला आहे.
भाजपने या ठिकाणी विजय इंगळे यांचे तिकीट कापून मंगेश झिने यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर विजय इंगळे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली आणि मंगेश झिने यांचा तब्बल 1839 मतांनी पराभव करत पाचव्यांदा विजयी पताका रोवली.
या प्रभागात ठाकरे गटाच्या सुरेखा काळे याही विजयी झाल्या असून उर्वरित दोन उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले. विशेष म्हणजे आज विजय इंगळे यांचा वाढदिवस असून, मतदारांनी त्यांना विजयाची मोठी भेट दिली आहे.
दरम्यान, विजयानंतर विजय इंगळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचं संख्याबळ 48 वरून 38 वर का घसरलं, असा सवाल उपस्थित करत अकोल्यातील भाजपच्या पराभवाला माजी महापौर विजय अग्रवाल कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी अंतर्गत स्तरावर प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.